Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

November 19, 2010

नागरी सेवा पूर्व परीक्षेचे

 देशात विविध क्षेत्रांत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वात महत्त्वाची अवघड परीक्षा म्हणून नागरी सेवा परीक्षेकडे पाहिले जाते. संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने दरवर्षी आयएएस, आयपीएस या अखिल भारतीय सेवा, तसेच केंद्रीय सेवांसाठी या परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. साधारणपणे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये नागरी सेवा परीक्षा (Indian Civil Service Examination) घेतली जाते. यातील पर्व परीक्षेचा पारंपरिक अभ्यासक्रम बदलवून आता नवा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशासन विभागाने १८ ऑक्टोबर २०१० रोजी या नव्या अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. २०११ च्या पूर्व परीक्षेपासून हा नवा अभ्यासक्रम लागू होणार असून या बदललेल्या अभ्यासक्रमाची माहिती देणारा हा लेख..
देशाच्या प्रशासनात उच्च अधिकारपदावर योग्य, पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी विविध क्षेत्रांत स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. लष्करात लेफ्टनंटपासून पुढील पदांसाठी संयुक्त सेवा, रेल्वेत उच्चव्यवस्थापकीय पदांसाठी स्पेशल क्लास रेल्वे अ‍ॅप्रेंटिसशीप परीक्षा, भारतीय वनसेवा, भारतीय अर्थसेवा आदी विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. मात्र या सर्व स्पर्धा परीक्षांपैकी देशपातळीवर अत्यंत महत्ताची, प्रतिष्ठेची आणि कठीण म्हणून नागरी सेवा परीक्षेला ओळखले जाते. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त आदी विविध महत्त्वाच्या पदांची निवड याच नागरी सेवा परीक्षेमधून केली जाते.
नागरी सेवा पूर्व परीक्षेचे जुने स्वरूप:
नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी पूर्वी वस्तुनिष्ठ (Objective) प्रकारच्या दोन प्रश्नपत्रिका होत्या. त्यात पहिली प्रश्नपत्रिका ही सामान्य अध्ययन या विषयाची होती. १५० प्रश्नांची दीडशे गुणांची दोन तास कालावधीची ही प्रश्नपत्रिका होती. यात भारतीय इतिहास, भारतीय आणि जागतिक भूगोल, भारतीय राज्यव्यवस्थापन, अर्थव्यवस्था, बुद्धिमापन आणि चालू घडामोडींविषयक प्रश्नांचा समावेश असायचा.
दुसरी प्रश्नपत्रिका ही वैकल्पिक विषयाची होती यात Agriculture, Animal Husbandry & Veterinary Science, Botany, Chemistry, Geography, Geology, Physics, Psychology, Political Science, Sociology, Indian History, Electrical Engineering, Medical Science, Commerce, Statistics, Zoology, Public Administration, Economics, Philosophy, Civil Engineering, Mechanical Engineering, Law, Mathematics या २३ विषयांपैकी एक विषय घ्यावा लागायचा. ३०० गुणांची ही प्रश्नपत्रिका होती.
या पूर्व परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ होते त्यात बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारलेले जायचे. दोन्ही विषयांचे प्रश्न हे इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतून विचारले जात. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय निश्चित केलेले होते त्यामुळे उमेदवारांना अचूक पर्यायाला उत्तरपत्रिकेत छायांकित करावे लागायचे. दोन्ही पेपरच्या अभ्यासक्रमाचा स्तर हा बारावी आणि पदवी स्तरावरचा होता. नागरी सेवा परीक्षा २००७ च्या जाहिरातींमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धती पूर्व परीक्षेला लागू करण्यात आली. त्याच्यामुळे चुकीच्या प्रत्येक उत्तराला एक तृतीयांश (०.३३) इतके गुण वजा केले जात होते.
नागरी सेवा पूर्व परीक्षेचे नवे स्वरूप
पुस्तकी अभ्यासक्रमावर आधारलेल्या जुन्या पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांच्या आकलन क्षमतेला किंवा त्याची विश्लेषण करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, मुद्देसूद तार्किक तत्त्वावर आधारलेला युक्तिवाद यासारख्या चाचण्यांचा समावेश नव्हता. उच्चपदांवर काम करताना व्यवस्थापन आणि लोकप्रशासनातील क्षमता उमेदवारांच्या अंगी असावी, असा जेव्हा विचार पुढे आला तेव्हा केंद्र शासनाच्या कार्मिक आणि प्रशासन विभागाने यासंबंधीने सविस्तर अभ्यास केला. विविध समित्यांच्या शिफारशीनंतर आता नवीन परीक्षा पद्धती स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांना पूर्व परीक्षेत समान प्रश्नपत्रिका ठेवण्यात येणार आहेत.
प्रश्नपत्रिका-१ : *गुण २००, *वेळ- दोन तास
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी
भारताचा इतिहास आणि राष्ट्रीय चळवळ
भारताचा आणि जगाचा भूगोल, ज्यात भारताच्या आणि जगाच्या भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोलाचा समावेश आहे.
भारतीय राज्यव्यवस्था आणि शासन, ज्यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायतराज व्यवस्था, जनतेसाठीचे धोरणे, हक्क आणि अधिकाराविषयक मुद्दय़ांचा समावेश आहे.
आर्थिक आणि सामाजिक विकास- ज्यात शाश्वत विकास, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण धोरणे आदींचा समावेश आहे.
पर्यावरणीय परिस्थिती, जैव विविधता आणि हवामान बदल आदी विविध घटकांचा समावेश राहील.
सामान्य-विज्ञान.
प्रश्नपत्रिका-२ : *गुण २००, *वेळ- दोन तास.
कॉम्प्रिहेन्शन (आकलन)
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किल्स)
लॉजिकल रिझनिंग आणि अ‍ॅनॅलिटिकल अ‍ॅबिलिटी (तर्कशास्त्र आणि विश्लेषण क्षमता)
डिसिजन मेकिंग अ‍ॅण्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग (निर्णय क्षमता आणि समस्यांचे निवारण)
जनरल मेण्टल अ‍ॅबिलिटी (सामान्य मानसिक क्षमता)
बेसिक न्यूमरसी (ज्यात संख्या आणि त्यांचे संबंध, संख्या परिणाम इत्यादी तर डेटा इंटरप्रीटेशन (तक्ते, आलेख, सारणी आदी) बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रीटेशन या दोघांचा अभ्यासक्रम स्तर दहावीचा असेल.
इंग्रजी भाषा आणि आकलन कौशल्ये (दहावीचा स्तर)
पूर्व परीक्षेच्या या सुधारित अभ्यासक्रमामुळे परीक्षार्थी उमेदवारांना आता केवळ घोकमपट्टी करून चालणार नाही तर खरा अभ्यास (विश्लेषणासह) करावा लागणार आहे. पूर्व परीक्षेच्या जुन्या अभ्यासक्रमात सामान्य अध्ययन हा विषय होता त्यातील बहुतांशी घटकांचा समावेश नव्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन प्रश्नपत्रिकेत केला आहे. जुन्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, भारताचा इतिहास, राष्ट्रीय चळवळ, देशाचा आणि जगाचा भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, सामान्यविज्ञान आदी घटकांचा समावेश होता. तोच अभ्यासक्रम थोडय़ाफार प्रमाणात फेरबदल करून सामान्य अध्ययन प्रश्नपत्रिकेत समाविष्ट केला आहे.
दुसऱ्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे पूर्णपणे बदललेले आहे. पूर्वी जुन्या अभ्यासक्रमात २३ वैकल्पिक विषयांपैकी एक विषय निवडावा लागायचा आता विषय निवडायची गरज राहणार नाही तर दुसरी प्रश्नपत्रिकादेखील सर्वासाठी सारखीच राहणार आहे.

दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये कॉम्प्रिहेन्शन या उपघटकात उमेदारांच्या आकलन क्षमतेचा अंदाज घेतला जाणार आहे. १० ते २० वाक्यांचा एखादा उतारा देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. काही वेळा तर उताऱ्यातील परिच्छेदांमध्ये अर्थपूर्ण सुसंगत बदल करायला सांगितले जाते. वाक्यरचना ओळखून योग्य शब्दांची निवड वाक्यात करणे, विरुद्धार्थी शब्द ओळख आदी प्रकारांचा समावेश यात असेल.
संवाद कौशल्याचा समावेश असलेल्या इंटरपर्सनल स्किल्स या उपघटकांत संवादाची पद्धती, शब्दांचा वापर आदींवर विशेष भर दिला जाईल. उच्चपदांवर काम करताना प्रभावी संवादकौशल्याची नेहमीच गरज असते. या कौशल्याचा वापर योग्य पद्धतीने करता येतो का? यासाठी ही चाचणी घेतली जाते.
उमेदवारांची एखाद्या गोष्टीबद्दल तर्कशुद्ध विचार करण्याची पात्रता ओळखण्यासाठी लॉजिकल रिझनिंग आणि अ‍ॅनेलिटिकल अ‍ॅबिलिटी अर्थात तर्कशुद्ध मीमांसा आणि विश्लेषण क्षमता या उपघटकाचा उपयोग होणार आहे. उच्चपदांवर काम करताना कोणत्या प्रश्नांना- समस्यांना सामोरे जावे लागते त्या वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्या पदावरील व्यक्तीकडे असणे आवश्यक असते. त्यासाठीच डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आणि समस्यांचे निवारण या उपघटकाचा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत समावेश केला आहे.
जुन्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन या पहिल्या प्रश्नपत्रिकेत सामान्य मानसिक क्षमता अर्थात जनरल मेण्टल अ‍ॅबिलिटीचा समावेश असायचा. आता हा उपघटक दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत समाविष्ट केला आहे. काळ, काम, वेग आदींसह विविध मानसिक पात्रता तपासणाऱ्या प्रश्नांचा यात समावेश राहील.
एकूणच, नागरी सेवा पूर्व परीक्षेचा नवा अभ्यासक्रम हा उमेदवारांच्या कसोटीचा ठरणार आहे. भरपूर वाचन, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव आणि इंग्रजीवर प्रभुत्व अशा त्रिसूत्रीच्या माध्यमातून या परीक्षेचा अभ्यास केल्यास यश हमखास मिळेल, हे निश्चित!

नागरी सेवा पूर्व परीक्षेविषयी महत्त्वाचे..
जाहिरात : नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात यूपीएससीची
नागरी सेवा परीक्षेची जाहिरात एम्प्लॉयमेण्ट न्यूज / रोजगार समाचार या साप्ताहिकांमध्ये सविस्तर स्वरूपात तर देशातील महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधूनही ही जाहिरात संक्षिप्त स्वरूपात प्रसिद्ध केली जाते.
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेस बसलेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. (पदवीच्या टक्केवारीची अट नसते.)
वयोमर्यादा : ज्या वर्षी परीक्षा घेतली जाणार आहे, त्या वर्षांच्या १ ऑगस्ट रोजी किमान २१ व कमाल ३० वर्षे वय असावे लागते. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे सवलत असते.

परीक्षा केंद्रे : मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पणजी (गोवा)
मुख्य परीक्षा : पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो. मुख्य परीक्षा ही पूर्णपणे वर्णनात्मक पद्धतीची असते. या मुख्य परीक्षेत भारतीय भाषा, इंग्रजी भाषा, निबंध, सामान्य अध्ययनाचे दोन पेपर आणि दोन वैकल्पिक विषय असतात. एका वैकल्पिक विषयाचे दोन पेपर्स असतात. असे एकूण नऊ पेपर असता.
क्र. विषय गुण वेळ
१. भारतीय भाषा ३०० ३ तास
२. इंग्रजी ३०० ३ तास
३. निबंध २०० ३ तास
४. सामान्य अध्ययन-१ ३०० ३ तास
५. सामान्य अध्ययन-२ ३०० ३ तास
६. वैकल्पिक विषय-क-१ ३०० ३ तास
७. वैकल्पिक विषय-क-२ ३०० ३ तास
८. वैकल्पिक विषय-कक-१ ३०० ३ तास
९. वैकल्पिक विषय-कक-२ ३०० ३ तास
वरील तक्त्यांवरून मुख्य परीक्षा ही जरी २६०० गुणांची वाटत असली तरी भारतीय भाषा व इंग्रजी या सक्तीच्या विषयांचे गुण गुणवत्ता यादीत धरले जात नसल्यामुळे मुख्य परीक्षा ही फक्त २००० गुणांचीच असते. मात्र, यूपीएससीने निर्धारित केलेले कमीत कमी गुण या दोन्ही विषयांत मिळविणे सक्तीचे असते. या दोन्ही विषयांमध्ये जर परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाला तर त्याचे पुढचे पेपर्स तपासले जात नाहीत. हे दोन्ही विषय वगळता, उर्वरित सात पेपर्सचे एकूण २००० गुण मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातात.
मुलाखत : ३०० गुण.
उमेदवाराचा दृष्टिकोन, निर्णयप्रक्रिया आणि आत्मविश्वास- संयमाची परीक्षादेखील या मुलाखतीद्वारे केली जाते. प्रशासकीय सेवा कशासाठी? सार्वजनिक, खासगी क्षेत्रे, आयआयटी, विदेशी विद्यापीठे, भारतीय संस्कृती, भारतीय समाजसुधारक, मराठी साम्राज्य, लिंग प्रमाण, महिलांपुढील समस्या, भारत-चीन संबंध, इंजिनीअरिंग, मराठी साहित्य, समाजवाद, खासगीकरण, जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी आदी अनेक विषयांना स्पर्श करणारे प्रश्न मुलाखतीद्वारे विचारले जातात. यातील अनेक प्रश्न हे उमेदवारांच्या व्यक्तिगत माहिती (बायोडाटा)शी संबंधित असतात. मुलाखत ही मराठी माध्यमातूनदेखील देता येते. अशा प्रकारच्या मुलाखतींमधून उमेदवारांची शेवटी नागरी सेवा परीक्षेसाठी निवड केली जाते.
उपलब्ध संधी : नागरी सेवा परीक्षेला बसण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला ४, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराला ७ संधी मिळतात. तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातीलर उमेदवारांना या संधींची कोणतीही मर्यादा नसते. एका पेपरला उमेदवार बसला तरी ती संधी ग्राह्य धरली जाते.
नागरी सेवा परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांना खालील सेवांमध्ये नेमणुका दिल्या जातात. अखिल भारतीय सेवा- भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय विदेश सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)
केंद्रीय सेवा गट अ- भारतीय डाक व दूरसंचार वित्त व अर्थसेवा, भारतीय लेखा व लेखापरीक्षण सेवा, भारतीय राजस्व सेवा (सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पाद), भारतीय संरक्षण लेखा सेवा, भारतीय राजस्व सेवा, भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीज् सेवा (अतांत्रिक), भारतीय डाक सेवा (टपाल सेवा), इंडियन सिव्हिल अकाऊटस्, भारतीय रेल्वे वाहतूक सेवा, भारतीय रेल्वे लेखा सेवा, इंडियन रेल्वे पर्सोनेल सव्‍‌र्हिस, रेल्वे संरक्षण दलामध्ये साहाय्यक सुरक्षा अधिकारी, इंडियन डिफेन्स इस्टेट सव्‍‌र्हिस, भारतीय माहिती सेवा (कनिष्ठ श्रेणी), भारतीय व्यावार सेवा.
गट ब- आम्र्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स सिव्हिल सव्‍‌र्हिसेस (कक्षअधिकारी ग्रेड), दिल्ली, अंदमान व निकोबार, लक्षद्वीप, दमन, दीव आणि दादरा नगर हवेली, नागरी सेवा, दिल्ली, अंदमान व निकोबार, लक्षद्वीप, दमन, दीव आणि दादरा नगर हवेली पोलीस सेवा, पॉण्डेचरी पोलीस सेवा
(सध्या तरी मुख्य परीक्षेच्या पपात कोणताही बदल झालेला नाही.)