Indira Gandhi--->

इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,१९१७ - ऑक्टोबर ३१,१९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या....इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.....इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तरी काँग्रेस मध्ये फुट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणुन संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवुन सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळ्वुन त्यांनी सरकार वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केल....

November 15, 2010

महाराष्ट्राचे संत

 संत तुकाराम
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निभिर्र्ड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच,तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानते.

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.

एका शुचिष्मंत घराण्यात पुणे जिल्ह्यातील देहू येथे शके १५३० मध्ये (इ. स. १६०८) वसंत पंचमी (माघ शु. पंचमी) या दिवशी त्यांचा जन्म झाला. नुकतीच इ. स. २००८ या वर्षी त्यांच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला, परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला.
भामगिरी पाठारी वस्ती जाण केली। वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले। पिडू जे लागले सकळीक।।
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार।।
या शब्दांत त्यांच्या तपश्र्चर्येचे वर्णन केलेले आढळते.

सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करणे हेच संत तुकारामांचे जीवन होते. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ या वचनावरून पंढरपूरचे त्यांच्या जीवनातील स्थान लक्षात येते. पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते.

वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्य होय. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन; कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका; विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो.
उदाहरणार्थ,
‘‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’’
‘‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।’’
‘‘तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।’’
‘‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।’’
‘‘ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।’’
‘‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।’’
‘‘शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।’’

तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत, की असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अनेक चरण हे मराठी भाषेतील सुविचारच बनून गेले आहेत. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सुमारे ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला.
‘आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा राम राम घ्यावा।।’, असे म्हणत तसेच,
सकळही माझी बोळवण करा। परतोनि घरा जावे तुम्ही।।
वाढवेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग बोलावतो।।
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी।।
अंत:काळी विठो आम्हासी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।

असे म्हणत ते फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) ब्रह्मलीन झाले. (शके पंधराशे एकाहत्तरी। विरोधक्ष नाम संवत्सरी। फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी। प्रथम प्रहरि प्रयाण केले।। अशी नोंद आढळते.)

श्रीसंत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दांत केले आहे.

जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। म्हणावे कसे हो तया लागी वाणी।।
परब्रह्मरूपी असा जो तुकावा। तयाचे तुकी कोण दुजा तुकावा।।

(Via ह्यांनी घडवले सहस्त्रक )

For more please click here...
http://www.lokanathswami.com/tukaram.html


संत रामदास

“शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे। कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।”

परमार्थ, स्वधर्मप्रेम, राष्ट्रप्रेम, संघटन, प्रबोधन, समाजकारण, राजकारण, प्रपंच, काव्य, साहित्य, बलोपासना अशा अनेक विषयांचे सर्वस्पर्शी कर्ते, भाष्यकार आणि द्रष्टे, पुरोगामी राष्ट्रसंत म्हणजे समर्थ रामदास स्वामी!

श्री समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब येथे ठोसरांच्या घरात झाला. हे सूर्योपासक घराणे होते. समर्थांचे पाळण्यातले नाव नारायण. बालपणापासून नारायण आपल्या विचारांनी, आचारांनी असामान्य वाटत होता. नारायणाने लग्नाच्या बोहल्यावरून आत्मोध्दारासाठी नाशिक पुण्यक्षेत्री धाव घेतली. दक्षिण गंगा गोदावरीचा पावन परिसस्पर्श अनुभवला व प्रभू श्रीरामचंद्राचे सान्निध्यही अनुभवले. गायत्रीमंत्राचे पुरश्र्चरण व रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले.

‘धर्म संस्थापना जगजीवना। भरतखंडी करणे असे।’ यासाठी त्यांनी कठोर तपाचरण केले. टाकळी येथे संगमावर १२वर्षे तपाचरण केले. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा मंत्र धारण केला. भारतभर तीर्थयात्रा केल्या. संपूर्ण देश पाहून परिस्थितीचा अंदाज घेतला. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. समर्थांनी स्थापन केलेल्या केवळ श्री मारूती मंदिरांचा (त्या संख्येचा) अंदाज जरी आपण घेतला, तरी आपल्याला थक्क व्हायला होते. अक्षरश: शेकडो मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.

समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची , वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।

प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -
प्रपंची जे सावधन। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।

समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात.
परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी , किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,
बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।
मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,

‘येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।
लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली।
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।
तैसी भाषा प्राकृत।।’

असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये! विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. त्यामुळे अगदी सर्वसामान्यांना पण त्यांचे काव्य सहज मुखोद्गत होते. त्यांच्या साहित्यातील प्रत्येक वचन हे स्वानुभवातून आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन आहे. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा खरे तर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.

विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्‍या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य! त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.

सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ‘दासबोधा’ चे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वत: अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्‍या (आजही मार्गदर्शक ठरणार्‍या) समर्थांनी इ.स. १६८१ मध्ये सज्जनगडावर समाधी घेतली.

जय जय रघुवीर समर्थ!

समर्थांचे वाङ्‌मय:
`श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध’ या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली.
आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी.
काही स्‍फूटरचना, भीमरूपी, मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या .

(via ह्यांनी घडवले सहस्त्रक)

संत गोरा कुंभार
गोरा कुंभार हे आध्यत्मिकदृष्ट्या संतपदाला पोहोचलेले होते, तसेच ते संत कवीही होते. पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते अनन्यसाधारण भक्त होते. गोराबा हे संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते. त्यांना सर्व जण गोरोबाकाका म्हणत असत. त्यांचे गाव मराठवाड्यातील धाराशिव-उस्मानाबादजवळील तेर-ढोकी (या गावास सत्यपुरी किंवा तेरणा असेही म्हणतात) हे होय. गोरोबाकाका प्रापंचिक असूनही विरक्तच राहिले. त्यांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता, पारमार्थिक क्षेत्रात त्यांचा शब्द प्रमाण मानला गेला. संत ज्ञानेश्र्वर-नामदेव यांच्या समकालीन असलेल्या गोरोबांचे जन्मवर्ष इ. स. १२६७ मानले जाते.

श्री विठ्ठलाचे स्मरण सतत त्यांच्या मुखात असे. त्यांना नामस्मरणापुढे कशाचेच भान उरत नसे. त्यांच्या भक्तिरसात बुडून जाण्याबाबतची पुढील कथा सांगितली जाते.

एकदा त्यांची पत्नी पाणी आणावयास म्हणून बाहेर गेली होती. तिने त्यांना आपल्या तान्ह्या बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. गोरोबाकाका उन्मनी अवस्थेत गाडगी, मडकी घडविण्यासाठी लागणारी माती तुडवून चिखल करीत होते. त्यांचे ते तान्हे लेकरू चिखल करताना पायाखाली तुडविले गेले, तरी त्यांना भान नव्हते. पत्नी पाणी घेऊन आल्यावर पाहते, तर तिचे मूल गतप्राण झालेले होते. तिने हंबरडा फोडल्यावर गोरोबाकाका शुद्धीवर आले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. गोरोबांना वाटले आपण काय करून बसलो. अतिशय मनस्वी पश्र्चातापात ते दग्ध झाले. पण काही काळानंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मूल जिवंत झाले आणि त्यांच्या पत्नीस परत मिळाले. यानंतर त्यांची पत्नीही विठ्ठलभक्त झाली.

(या घटनेवर आपला विश्र्वास बसत नाही. पण गोरोबाकाकांचे कोणतेही लिखित चरित्र उपलब्ध नाही. २-३ प्रसंग मौखिक परंपरेतून चालत आले आहेत. या प्रसंगांवरून त्यांच्या अमर्याद भक्तीची व त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची कल्पना आपल्याला येते एवढे निश्र्चित.)

संत गोरोबांकडे तेर-ढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्र्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्र्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी ‘कोणाचे मडके (डोके) किती पक्के’ अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली होती, असाही प्रसंग सांगितला जातो.

संत गोरोबांची उपलब्ध काव्यरचना अत्यल्प आहे. त्यांचे सुमारे २० अभंग सकलसंत गाथेत समाविष्ट केले आहेत. त्यांची काही पदरचना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिर येथील बाडात सापडते. गोरोबा हे साक्षात्कारी संत होते.
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे। तव झालो प्रसंगी गुणातीत।।
अशा त्यांच्या अभंगांत अद्वैत साक्षात्काराचीच अनुभूती केवळ प्रकट झालेली दिसते. ‘म्हणे गोरा कुंभार’ ही त्यांची नाममुद्रा होय.

If you want a book ..Click here